गज्जलाञ्जलि - झुरतों तुझ्यासाठी परी कळण...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
झुरतों तुझ्यासाठी परी कळणार हें तुजला कसें ?
डोळ्यांत हृदगत माझिया तुज कां दिसे न मदालसे ?
चाले हळू डौलांत ती मूर्ती तुझी दिसतां पर्थी
चारीहि डोळे भेटती मग कां असें ? मग कां असें ?
खोटेंच का म्हणती कवी ? - प्रणया न अन्तर थाम्बवी,
दुरुनीहि भाषा पल्लवी शकतीं कराया मानसें.
म्हणती अशिक्षित चातुरी युवतीमधेच पहा पुरी;
मग मागणीविण मन्जुरी देशी न कां तू राजसे ?
साङगूंच का भेटूनिया की तू जिवाची या प्रिया ?
भुलतात ना पुरुषा स्त्रिया झुलवील तो जर साहसें ?
म्हणती, स्त्रिया अबला तुम्ही, पुरुषी कृती ती मर्दुमी;
न कथूं शकें तुज हेतु मी, मनिं खोल तो दडुनी ठसे.
पुरुषी कसा अभिमान हा लववी न मान जरा पहा !
अव्हेरितां भलती तर्हा !- जगतांत होऊल ना हसें ?
जाती दिनांवरतीं दिनें वैर्यापरी तुझियाविणे;
जरि घेरिलें मज भीतिने हृदयीं तरी आशा वसे.
तुज सेवितां नच ये अता भक्तास तू जरि देवता;
भटकूं किती दिन ऐकटा ? व्यसनांतुनी सुटका नसे.
तपतां धरा घन वर्षतो. ये शान्ततेसह हर्ष तों,
कर तूहि सौख्य - स्पर्श तो तव रागरञ्जित वाग्रसें
२४ जुलै १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP