मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
“प्रेम होतें, तें निमालें...

गज्जलाञ्जलि - “प्रेम होतें, तें निमालें...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


“प्रेम होतें, तें निमालें काय त्याला मी करूं ?
कोम आला, वाढला अन वाळला आता तरू.

जन्मलें जें मृत्यु त्याला ठेविलेला मागुनी -
काळरूपी कायदा हा, त्यापुढे मी लेकरूं.

मर्द होऊनी मृताचा शोक वाया कां असा ?
कां नये ‘होणार’ पाहूं आणि ‘झालें’ विस्मरूं ?”

जीवितीं आराम नाही, भोवती तापे मरू,
वाळवण्टीं त्यांत तू का अन्थरावे गोखरू ?

कां वकीली ? सख्य गेलें, जाहलें तें जाहलें !
पाहशी वैत्यापरी कां काळजाला पोखरूं ?

प्रेम वाटे तूज जाणों रङगधारी तेरडा,
आणि राहे नित्य का हा चारु रूपाचा सरू ?

या जगींच्या कायद्याची प्रेम पर्वा ठेविना,
वाट बान्धांतूनि काढी आणि लागे पाझरूं.

प्रेम गेलें, दुक्ख मेलें ! जा. तुझी तू स्वामिनी !
चञ्चले, आराधना मी विस्मृतीची कां करूं ?

प्रेम होतें, बोलशी तू, हें खरें सारें तरी
पूर्वकालींच्या स्मृतीला कां नये तू आदरूं ?

हौसजिज्ञासा क्षणाची का जिवाला लागली
जीमुळे रङगेल पुष्पीं झेप घे फुल्पाखरू ?

प्रीतिसङ्गें जे सुखाचे दीस गेले ते खरे !
आज भाण्डारें रितीं हीं, ये स्मृतींनी त्या भरूं !

मृत्यु ज्याला जन्म त्याला ठेविलेला मागुनी
ही निराशेंतील आशा कां नये स्वान्तीं धरूं ?

१७ मे १९२१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP