गज्जलाञ्जलि - येतां दिनान्त सन्निध येती...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
येतां दिनान्त सन्निध येती न त्या झळी,
वाहे हवा सुखावह, आराम या स्थळीं.
या वायुवीचि शीतल लीलेंत नाचती
कैशी सरित्तनूवर गुम्फीत साखळी !
घाटास चुम्बितां जळ वाजे डुबुक - डुबुक,
खुण्टावल्या तरी हळु हेलावती जळीं.
पोचेल द्दष्टि तोंवर तापीपलीकडे
शिन्दी रसाळा आणिक त्या रूक्ष बाभळी.
निम्बोणि आणि सूक्ष्मसुगन्धी शिरीष हें,
यांच्यावरी ऊभ्या धरिती छत्र नारळी.
बाळें तजेल ज्यांवर सानन्द खेळती
ते गालिचेच का मऊ दाबीव हिर्वळी ?
हे पोपटी तृणाङकुर नाजूक का जणू
काश्मीरचीच लोकर अन तीहि जावळी !
प्यायास नारळी पय पेल्यांत सृष्टीच्या,
खायास साखरेपरि हीं मोह - शाहळीं.
गप्पांस काव्यशास्त्रविनोदी असे सखे,
गायास कण्ठ सुस्वर अन गज्जलाञ्जली.
खेळावया मनोरम - सेना सभोवती,
खेळाडु आणि चौकस ही बाळ मण्डळी.
येतां निशा ह्ळूहळु जाऊं कुणी कुठे.
आरक्त या क्षणीं तरि ये मौज आगळी.
३१ मे १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP