मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
स्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...

गज्जलाञ्जलि - स्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


स्फूर्ती दिली तू, गाऊलीं मी फार पूर्वी गायनें,
पायीं तुझ्या मी वाहिलीं तीं प्रेमगीतोपायनें,

पिवळी जुनी कविता - वही ही पाहुनी वाटे अता
सायन्तनीं स्मरतां ऊषा वाटे जसें हसितानने !

द्दष्टींतुनी चुकती न हे जरि साम्प्रदायिक मायने
गवसे अकल्पित अर्थही नवसूक्ष्मभावरसायनें,

माझीच मात्र न हो मला जाणीव राजस मानिनी,
कवनांत माझ्या ऊकतों तव मागलीं मधुभाषणें,

माझ्या - तुझ्यामधि साचलें कित्येक वर्षांचें धुकें,
विसरूनि गेलों गान तें कीं जाहलों दोघे मुके,

ती तीव्रता, आसक्ति ती गेली, अहन्ता लोपली,
भक्तीच केवळ राहिली, न हिचा जिवन्त झरा सुके.

बदलूनि मन्त्र जुना पुन्हा निर्माल्य हा तुज वाहिला.
दिन सम्पला. कृष्णाम्बरीं ध्रुव मात्र तेवत राहिला.

६ मार्च १९२४


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP