गज्जलाञ्जलि - निमालीच का माया ? कशाला द...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
निमालीच का माया ? कशाला दुरी जाशी ?
पुन्हा स्नेह सम्पादूं कसा आणि कोणाशी ?
तुझ्यावीण या रातीं मला कोण साङगाती ?
मुखेन्दूच तूजा हा जगीं या तमोनाशी ?
तुझ्या सङगतीं गेली सुखाचीं किती वर्षें !
स्मरूनीच राहूं का गतप्रीतिच्या राशी ?
तुझ्या सङगतीं जीं जीं मला लाभलीं श्रेयें
न तीं खोल पाताळीं, न तीं ऊन्च आकाशीं,
कृपेची तुझी द्दष्टी करी जी सुधावृष्टी
वसे ती न वैकुण्ठीं, असे ती न कैलासीं.
तुझ्या प्रीतिची ज्वाला करी शुद्ध जीवाला,
नको जान्हवी - रेवा, नको द्वारका - काशी.
नको जाऊं टाकोनी, नसे या जिवा कोणी,
अता भार:का झालों ? तुवां गोविलें पाशीं.
बरें, जा हवें तेथ, तुला दैवहें नेतें,
परि देवि, जातां जा मला देऊनी आशी,
६ एप्रिल १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP