गज्जलाञ्जलि - येथेच गे तू चाखिली कवितें...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
येथेच गे तू चाखिली कवितेंतली मम माधुरी,
सुरसज्ञतेसह दाविली निज मञ्जुभाषणचातुरी.
तो हाच कातळ काजळी; सन्ध्या तशी आरक्त ही,
हिरवी तशी झाडी तळीं, गिरिपङिक्त दूर तशी भुरी.
परि दोन या सन्ध्यांमधे जो काळ गेला लोटुनी
क्रान्ती तये किति पाहिली जरि गुप्त ती अपुल्या ऊरीं.
विजनीं ऊथे मी प्रत्यहीं वसतोंच सङकेतस्थलीं,
ठरवूनि तू स्मरशी न तू ? तव भावना चपला पुरी !
श्रद्धाळु साधा मी फसें, जगतीं स्वभावच हा गुन्हा !
निर्दोष बाजुस तू पुन्हा करणी करुनि मयासुरी !
हुरळूनि जावें कां घनें चपला जरी बहु साजरी ?
अश्रूंत हो लय, हो गती येतां सखी अन्त:पुरीं.
रङगूनि मी गेलों जणू कुणि अप्सरा मज लाभली
- न मिळेच ती मेल्याविना करुनी रणांत बहादुरी.
स्वप्नींहि ये न कधी अशी द्विमुखी परी ही कीर्ति ये,
अङगार दे ऊधळूनि ही माझ्या मधुप्रेमाङकुरीं,
याचेंहि काय तुला सखे ? ऊलटी मजाच दिसेल की !
‘वणवा न तो, दीपावली !’ म्हणतात जे वसती दुरी.
कुणि हाच गज्जल दावितां म्हणशील वेळुनि मान तू -
म्हणती वृथा न कवी तया, किति भावनोत्कट माधुरी ?
२८ मार्च १९२९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP