गज्जलाञ्जलि - पुष्प नामी तू लताग्रीं पा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
पुष्प नामी तू लताग्रीं पाहिलें
होलवीलें जाय जें मन्दानिलें.
तू पथें जातां खुडूनी लीलया
नीट अम्बाडयावरी तें खोविलें.
स्वर्ग त्याला लाभला तेव्हा असें
धन्यतेचें हास्य पुष्पें दाविलें
पुष्प कोठे आणि कोठे देवता ?
पुष्प ताजें नित्य पूजेला मिळे.
सत्य हेंही, पुष्प ताजें कालचें
आजला तें होऊनी जाऊ शिळें,
तू स्वताच्या मात्र हौशी पाहशी,
कां तुला निन्दूं परी मी ऊर्मिले ?
काल शीर्षीं आज तें पायीं पडे -
धिग ! विधे, पुष्पासही तू नाडिलें !
७ फेब्रुवारी १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP