हिन्दपुत्रांनो, स्वतांला लेखितां कां बापडे ?
भ्रान्त तुम्हां कां पडे ?
वाघिणीचें दूध प्यालां, वावबच्चे फाकडे. भ्रान्त०
हिन्दभू वीरप्रसू जी वैभवाला पावली
कां अता खालावली ?
धन्यता द्याया कुशीला अङग झाडा, व्हा खडे ! भ्रान्त०
पूर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून का ?
झिडगुनी डोलूं नका;
लक्ष द्या चोहीकडे, द्या कालवैशिष्टयाकडे ! भ्रान्त०
जीर्व त्या कैवल्यकुण्डीं घाण देखा माजली,
डुम्बतां कां त्या जलीं ?
ओज पूर्वीचें न तेथे, तीर्थ तें आता सडे. भ्रान्त०
ज्ञानगङगा वाहते पूर्वेकडे, घाला ऊडया,
अन्तरीं मार बुडया;
सम्पली पूर्वग्रहांची रात्र, झालें ताम्बडें. भ्रान्त०
मोकळी ही खा हवा, चैतन्य अङगीं खेळवा,
आत्मशुद्धी मेळवा,
मुण्डिती जे फक्त डोकें तेच गोटे कोरडे ! भ्रान्त०
श्रेष्ठता जन्मेंच का ये ? जातिदर्पाला त्यजा,
हिन्दुतेला या भजा,
नेमका कां भेद भासे ? साम्य सारें कां दडे ? भ्रान्त०
ब्राम्हाणत्वाची बढाऊ लाज ही वेदास हो !
षड्रिपूंचे दास हो !
लोकसेवा, सत्यशुद्धी ही कराया व्हा सडे. भ्रान्त०
कर्मयोगी ऐक व्हा रे, नायकी वा पायकी
दावुनी घ्या लायकी;
खानदानींतील नादाना, करीं घे फावडें. भ्रान्त०
जो करी कर्तव्य, घामेजूनि खाऊ भाकरी
धन्य त्याची चाकरी !
कर्मजा सिद्धी ! न गीतावाक्य हें खोटें पडे. भ्रान्त०
लेखणी बन्दूक घ्या वा तागडी वा नाङगर
हिन्दवी व्हा चाकर;
ऐक रक्ताचेच आहों साक्ष देऊ आतडें. भ्रान्त०
ऐकनाथाची कशी आम्हांस होऊ विस्मृती
जो दया मानी स्मृती,
जो कडे घे अन्त्यजाचें पोर पान्हें शेम्बडें ! भ्रान्त०
सङकराची बण्डखोरीची उभारा या ध्वजा !
उन्नति स्वातन्त्र्यजा !
राजकी वा गावकी - सारीं झुगारा जोखडें ! भ्रान्त०
भारताच्या राऊळीं वत्तीस कोटी देवता
जागत्या, या पावतां
मुक्तिसङगें स्वर्ग लाभे - कोण पाही वाकडें ? भ्रान्त०
पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी,
श्रीश्वराला लाजवी,
चूड घ्या अन चेतवा हें रूढ धर्माचें मढें ! भ्रान्त०
काय भिक्षेची प्रतिष्ठा ? चैन चाले आयती.
मुख्य दीक्षा काय ती ?
कष्टती ते खस्त होती पोळ साऊ - जोघडे. भ्रान्त०
‘बुत शिकन’ व्हा ! ‘बुत्फरोशी’ कासया बालाग्रही ?
भक्त व्हा सत्याग्रही !
मानिती वेडयास साधु स्वार्थसाधू भावडे. भ्रान्त०
आचारा शान्तिक्षमा, निन्दोत ते जे निन्दिती,
संयमीला न क्षिती.
वैरबाधा खास दिव्य प्रेममन्त्राने झडे. भ्रान्त०
ही अहिंसा प्रेमनीती वाटतां नामर्दुंमी
क्षात्रता दावा तुम्ही.
सोडवा क्षेत्री लढूनी राज्यसत्तेचे लढे. भ्रान्त०
द्दष्टि राष्ट्राची हावी स्वार्थातही जी नेहमी
ऊन्नतीची घे हमी;
जो अहिन्दी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे. भ्रान्त०
बन्धुला हाणावयाला पत्करूनी दास्यही
शत्रु आणावा गृहीं,
दोष हा राष्ट्रन्घ अद्यापीह देशाला नडे. भ्रान्त०
तो असो जैचन्द वा राघो भरारी वा कुणी
तो स्वराज्याचा खुनी !
हाकुनी धिक्कारुनी द्या त्यास सैतानाकडे ! भ्रान्त०
बन्धुलाही गान्जुनी जो शत्रुगेहीं मोकली
मूळ साक्षात तो कली !
ना गणा त्याची प्रतिष्ठा, तें विषारी रोपडें ! भ्रान्त०
ऊच्छितां स्वतन्त्र्य, द्या स्वातन्त्र्य हें अन्यासही,
का न कोणा आस ही ?
कां गुलामांचे तुम्हां सुल्ताना होणें आवडे ? भ्रान्त०
‘जो बचेंगे तो लढेंगे ’! शूर दत्ताजी वदे,
स्वामिकार्यीं जीव दे,
शौर्य हें दावाल का कल्ले मिशांचे आकडे ? भ्रान्त०
काळ राष्ट्रांच्या चढाओढींत लोटी खामखा,
अन्ध ऐआराम कां ?
स्वर्ग जिङका वा मही ! ऐका रणींचे चौघडे भ्रान्त०
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला,
थाम्बाला तो सम्पला !
धावत्याला शक्ति येऊ आणि रस्ता सापडे. भ्रान्त०
जा गिरीच्या पैल जा ! समृद्धि नान्दे वैभवें
तेथ सौन्दर्यासर्वे;
मोकळीकीच्या मुदें ऊत्कर्ष तेथे बागडे ! भ्रान्त०
हिन्द - पुत्रांने, हिताचें तें तुम्ही हातीं धरा,
ऐरव्ही माफी करा.
शब्द माझे बोबडे अन ज्ञान माझें तोकडें
चित्त माझें भाबडें.
१९ मे १९२१