गज्जलाञ्जलि - शैशवींचा सहज स्नेह पुन्हा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
शैशवींचा सहज स्नेह पुन्हा
केवि कोठे जडणें तो अधुना ?
भोवतीचे जन हे सुज्ञ किती -
विश्वसीना कुणि चित्तांत कुणा.
खेळिमेळींत घडी जाय, पुरे !
मैत्रिकीचा विलसे हा नमुना !
द्दष्टि सर्वत्र सुवर्णींच कशी,
न बघे कोणिहि अन्तस्स्थ खुणा.
मित्रनिन्दा करणें आडुनि ती;
शिष्टपन्थीं नच हा होय गुन्हा !
अन्तरींचा सहज स्नेह तयां
जन्म त्यावाचुनि वाटे न सुना.
आणि होशी मज कौमार - सख्या
हेमगर्भासम तू मित्र जुना.
काय मागूं ? अस कोठेहि दुरी,
ऐतरांच्याच सुखें फेड ऋणां.
प्रीति तूझी स्मरतों हीच पुरे,
प्रभुची ही मज वाटे करुणा !
सुख तूझ्या स्मरणींही किति हें !
पुण्यशीला, किति रे मीच कुणा !
१५ जुलै १९३१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP