गज्जलाञ्जलि - जहाली ऊषा जागी सखे, तूहि ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
जहाली ऊषा जागी सखे, तूहि हो झणी,
ऊषेसारखा ऊञ्ची करी साज साजणी.
तिचें रूप दावाया बने सिन्धु आरसा,
पहा तू बहारीचा तुझा ऊन्दु दर्पणीं.
ऊषेसङ्गती भानू धुक्यांतूनि ये वरी,
स्तवूं यास सूक्तांनी असे रम्य पर्वणी.
‘फिरा या मऊ वेळेवरी वा गिरीवरी,
उठा प्रेमयुग्मांनो,’ सखे ऐक अश्रणी.
समुद्री हवा खारी सुखें सेवुनी फिरू,
वनश्रीस भेटूं या - सती पूज्य देखणी.
लपूनी लताकुञ्जीं करूं प्रेमकूजितें,
पडूं वा सुखारामीं हरित शाद्वलाङगणीं,
तिथे फूलझाडांचे उभे दाट ताटवे,
तुझी वेणि गुम्फाया करूं पुष्पसन्चणी.
म्हणूं ऐक आवाजें तुझ्या आवडींतली
खर्या प्रेमलीलेची रसोदात्त लावणी.
गुलाबी प्रभातींची असो झोप साखरी,
पुरे सोडग हें आता, झणी ऊठ साजणी.
९ ऑक्टोबर १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP