मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
बाळ जा ! तप्ताश्रु हे येथ...

गज्जलाञ्जलि - बाळ जा ! तप्ताश्रु हे येथ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


बाळ जा ! तप्ताश्रु हे येथेच ढाळूं दे मला,
जा गडे, कां हात आता घालिशी माझे गळां ?

आग्रहें तूझ्याच घेऊं दूध मी, याने परी
शान्त होऊ काय हा जो डोम्ब चित्तीं पेटला ?

तें प्रसूतीचें न ठावें दुक्ख यासाठीच का
लागती जीवास कन्यादान - दुक्खाच्या कळा ?

वाटतें लक्ष्मीच कोणी ने हृदींची चोरूनी,
दान मी केलें जरी मोठा करूनी सोहळा !

तूज पुत्राच्या ठिकाणीं मानिलें मोहूनि मी
कष्टलों की या जगीं लागोत ना तूते झळा.

सासरीं तूझ्या अता मी वागणें चोरापरी -
साङगशी काही तरी लाडांत की ‘तेथे चला’

तू स्मृती मत्प्रीतिची - आता न तू माझी अशी.
जागच्या जागींच मी चिन्तेंत तूझ्या वेगळा.

बाळ जा ! निष्काम सेवा सासरीं सौख्यें करी,
कां न मातेची आशा कन्येस ती साधे कला ?

अश्रु कां नेत्रीं तुझ्या सौभाग्यसम्राज्ञी मुली ?
देख भावी स्वर्ग - माझा तोड, जाऊं दे लळा !

रम्यरङगी स्वर्ग तो अश्रूंतुनी भासे जसा
तो गिरी वृष्टींतुनी सौवर्ण तेजाने भला.

पूस डोळे, हास बेटा ! आणि जातांना असा
चुम्बनाने गोड सम्पो वास तूजा येथला.

ऐक ! जा ! हाकारितें त्या मण्डपीं कोणी तुला.
राहणें आशाश्मशानीं यापुढे मी ऐकला.

६ सप्टेम्बर १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP