मी श्यामले, बन्दी तुझा वन्दीं तुला अभ्यन्तरीं,
तू दक्षिणा दे वा न दे, निश्शब्द मी सेवा करीं.
हें रक्त तारुण्यांतलें देहांत नाचूं लागलें,
खेळो खुळें प्रेमागळे, थाम्बेल हें कालान्तरीं,
श्रीष्ठ स्फुरे, आत्मा ऊडे, बाहू कसे होती पुढे,
ऊर्वीतलीं हे बापुडे, तू शुक्त की श्यामाम्बरी,
हें चित्त भोळें भाबडें घेऊ आशी तूझ्याकडे,
याचें तुला कां साकडें ? दुष्प्राप्य तू ऊन्चावरी,
देऊं नको तू चुम्बनें, देऊं नको आलिङगनें,
देऊं नको तू दर्शनें, मी धर्म माझा आचरी,
त्वन्मन्दिराचें अग्र मी वन्दूनि मन्मार्ग क्रमीं,
मी भांक्तच्या या सम्भ्रमीं जाणेंच माझी पायरी.
हे हृत्प्रभे, हे दुर्लभे, हे स्वाभिमानी भामिनी,
हे कामिनी,हे स्वामिनी, येऊं नको तू पञ्जरीं.
ताजी कळी तू कोवळी राही कुठेही मोकळीम
बाधा वियोगाची मुळी नाहीच वाय़ूला परी.
भद्रासनीं चित्ताचिया ही शोभते भक्तिप्रिया;
सारें हिला अर्पूनिया मी पूजितों माझ्या घरीं.
१३ जुलै १९२०