गज्जलाञ्जलि - कां दया ये न तूते दीननाथा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
कां दया ये न तूते दीननाथा दयाळा ?
कां मला आडरानीं टाकिशी लोकपाळा ?
यौवनाच्या मदाने पाडिली भूल मागे,
आणि मात्रासुखांचा जाय लागूनि चाळा.
ती अहन्ता गळाली, मोहनिद्रा पळाली,
आत्मविश्वास गेला, दैन्य आलें कपाळा.
मत्त होतों मदाने मी गजेन्द्राप्रमाणें,
झोम्बतो नक्र पायीं, मार या क्रूर काळा !
नन्दपत्नीस कान्हा, मी तसा तूज तान्हा;
ह्ट्ट घेऊं तुझा मी, राहशी का निराळा ?
ही मिठी घट्ट तूझ्या मारिली आज पायीं,
माऊली, घे कडे घे मूढ लाचार बाळा !
झांकितां पल्लव तू क्षीण या तान्हुल्याला
जाच ना दे ऊन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
तू जणू क्षीरसिन्धू, दे मला ऐक बिन्दू;
दाबिशी कां बळें तू अन्तरींचा ऊमाळा ?
७ नोव्हेम्बर १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP