मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
रसज्ञ हो, पहा वसन्त पातला...

गज्जलाञ्जलि - रसज्ञ हो, पहा वसन्त पातला...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


रसज्ञ हो, पहा वसन्त पातला,
घरांत खन्त कां ? कुठे फिरायला,

कुठे ! न काय आर्तशब्द ऐकुं ये ?
स्वरांत गूढ हाच सूर आगळा !

हवें कशास वस्त्र ? ऊब अग्नि दे
निसर्ग - होलिका - महोत्सवांतला ?

विरक्ति कां जरा - दशेंतली वृथा ?
करा विरक्तिभाव दग्ध आपला.

बघा पलाश - शाल्मली फुलूनि हा
सु-रक्त यौवनानुराग फाकला,

वसन्त लागणी जिवन्त ही करी,
शिके बनूनि शुक्रशिष्य का कला ?

सभोवती बघूनि चारुता नवी
जिण्यास कोण हो विटे ? वदा मला.

कुढायचें रडायचें अता नको !
क्षणैक घ्या हसूनि हासवा, चला ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP