नमोऽस्तु ते ! जयोऽस्तु ते ! हिरण्यगर्भ भास्करा !
सुवर्णपाद लावुनी करी पवित्र ऊम्बरा.
करीत अर्घ्यदान मी त्रिवार तूजला नमीं.
विभूति मित्र वन्द्य तू प्रकाशकांत श्रीश्वरा.
स्तवी तुलाच पारशी करीत याचना अशी,
प्रकाश पाड मानसीं प्रकाशवीत अम्बरा.
विहङगसूक्तगायनें घुमूनि राहिलीं वने,
सरू डुलूनि वारिती तुझ्यावरूनि चामरा.
करूनि शान्त जङगलें नभांत मेघ पाङगले,
प्रभातरङगमङगलें प्रसन्न हो वसुन्धरा.
निसर्गदेवता नटी, धटी कटीस पोपटी,
न ऊत्सवास ओहटी, भरे मनांत सुन्दरा.
कभिन्न वृद्ध हे गिरी; शिखा न यांचिया शिरीं
विशाल शाल अञ्जिरी लपेटिती महोदरां.
पहा सुवर्णचम्पका - टपोर चित्तचुम्बका -
बहार पारिजातकावरील ओसरे जरा.
फुले मजेंत तेरडा, खुले तजेल केवडा,
सुगन्ध मन्द विस्तरी जगांत वात नाचरा.
गमे सुदीर्घ माण्डवामधूनि जाय कालवा,
कडेकडेस वाहवा ! फुले विचित्र फुल्वरा,
अभूतपूर्व वैभवें निसर्गरूपहें नवें
तुला न वा नवे कवे, जुळूं नकोस अक्षरां.
निनादतात चौघडे, विशेष काय हो घडे ?
तुरुष्क - शत्रु तो पडे फजीत, चीत, घाबरा.
प्रभाव दाविला निका तुवां कमाल सैनिका !
पिटूनि काढिलें ग्रिकां, मदान्ध देशतस्करां,
जुनाट राष्ट्रतारवा सुधीर तूच नाखवा,
बळें अचाट फोडिला भुकेल शत्रु - भोवरा.
अपूर्व राजकारणीं समर्थ ऐक तो धणी,
न हो परावलम्बनीं कुणीहि मित्र, सोयरा.
स्वराष्ट्रतत्त्व दाविशी, न धर्मभावना पिशी.
रणीं अरींस दापिशी, परी नरक्तहावरा.
तुझी ऐदार मर्दुमी, हुशार धूर्त रुस्तुमी
किती म्हणून वर्णुं मी ? तुझा दिगन्त अस्करा !
कवी नवीन हिन्दु मी, कुठे कमाल तू रुमी ?
परन्तु लोकशाहिचा सदा शुभेच्छु मी खरा.
तुला म्हणूनि मी स्तवीं मराठबोल ऐकवीं.
सुधारणा स्वतन्त्रता परस्परांस आसरा.
प्रसिद्ध तू रणाङगणीं तसाच राजवारणीं,
सुधारकांत अग्रणी कमाल तूच मोहरा !
३ सप्टेम्बर १९२३