मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...

गज्जलाञ्जलि - “तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही रचितां,
पहा परन्तु परोक्षीं स्फुरे गडया, कविता,

अगम्य आणिक तेढा किती स्वभाव तिचा !
वियोगशासन दे ती रुसूनि याकरिता

रुचे कवीहुनि कां काव्य, वस्तुहूनि छबी ?
रुचे न भाव मुका कां असूनि खोल जिता ?

तिला वियोग कसा सहय हो जरी कवनीं
स्मृतींत मोहक नावीन्य होय दाखविता ?

तिच्या समोर मलाप्रीतिचेंहि भान नुरे
म्हणूनि काय गमे तीस भाव - कोश रिता ?

अवर्णनीयच तो तत्प्रसाद, काव्य पळे !
वियोगतापच काव्यास हाय हो जनिता !

विचित्र सिन्धुपरी स्फूर्ति ही, हिला भर ये
द्रवे हिमाद्रि जऊं चण्ड तापुनी सविता.

तऊंच रङगुनि धावे असीम होऊनि ही,
किती भयानक लावण्य दाखवी सरिता !

त्यजूनि मानसकासार - चारु दर्पण की !
रुचे कषायित कल्लोलिनी कशी ललिता ?”

“अरे असूनि कवि स्त्रीखभाव नेणशि तू !
वृथा न ती कवनीं प्रीति दाखवी वनिता.

रुचे न गुप्त म्हणूनी सरस्वती तरुणां -
मरीचिकाहि रणीं मोह पाडिते तृषिता.

‘गडे, किती किति हें प्रेम मी करीं !‘- वच हें
सदैव आतुर ऐकावया असे दयिता.”

२२ जुलै १९३०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP