गज्जलाञ्जलि - अव्याज आणि राजस तू भेटतां...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
अव्याज आणि राजस तू भेटतां कुमारी
हो शान्त भाव अन्तरिं माझा पिपासु भारी.
आलों चढूनि डोङगर तों नेमकी पुढे तू !
मी श्रान्त पान्थ आणिक तू सावली दुपारीं,
पूर्वी किती मनोरथ घाटांत चूर झाले.
मी थाम्बलों न की जगिं आशा जिगीषु तारी,
मी शैलजा म्हणूं तुज का क्षीरसिन्धुकन्या ?
का चन्द्रिकाच जी स्थित हो पुष्पवत तुषारीं ?
झालों त्रिदण्डि तूजच धुण्डावया सुभद्रे
गे ऐक सत्य भाषण हें भावनानुसारी.
ही प्रीति दे मला तव हातांत देवते गे,
“सा मानुव्रता भव !” बोलेल का पुजारी ?
तेढा कुरुप मी मज सारल्य, चारुता दे,
कुब्जेस दे अलौकिक लावण्य तो मुरारी,
आशा सदैव चञ्चल, हीतें विराम दे तू,
स्वीकारुनी सखे मज वेडयास या सुधारी
जीवास दर्शनें तव आनन्द - शान्ति लाभे,
आता हरूनि तू मज दे काम्य - मोक्ष चारी,
११ ऑगस्ट १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP