कोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र विमानीं
अज्ञात ठिकाणीं
स्वातन्त्र्य जिथे, शान्ति जिथे, प्रेम ऊमानी
तेथे चल राणी !
सामाजिक सम्बन्ध सखें, हे न टिककाऊ;
हे स्नेह दिखाऊ !
मी तूज, मला तू, प्रभु दोघांस निदानीं तेथे०
भाळे ऊथे प्रीति धनावीण कुणाला,
ना मोल गुणाला;
लावण्य नसे जेथ जणू चीज किराणी, तेथे०
व्हा बद्ध ऊथे, प्रेम करा वा न कराही,
नातें द्दढ राही;
गे लग्नविधी जेथ न जीवैक्य - निशाणी; तेथे०
नातें पुरुषस्त्रीमधि तें ऐकच वाटे,
ऐसें ऊफराटें
ज्यांचें मत त्यांचें वच यावे नच कानीं, तेथे०
डोळ्यांत ऊथे लाडिक जादू परि खोटी,
अन संशय पोटीं;
साधेपण जेथे न गमे गूण अडाणी, तेथे०
काहीहि करा ही जनता मारिल नाङगी
हासूनि अपाङगीं,
घ्येयास पुरा वाव मिळे, होय न हानी. तेथे०
स्वातन्त्र्य न सत्तेविण, सम्भावितताही
दम्भाविण नाही;
स्वार्थापुरतें सत्य न जेथे कुणि मानी, तेथे०
अन्याय ऊथे जोंवर अन्यास जहाला
तों त्रास कशाला ?
जेथे न शिणे केवळ लाभास्तव वाणी. तेथे०
ही चैन अविश्रान्त, बडेजाव विकाऊ
टाकूनिच जाऊं;
स्वाभाविक कष्टाळु जिथे रम्य रहाणी, तेथे०
ये कोठुनि कष्टाविण विश्रान्ति दिनान्तीं,
धर्माविण शान्ती ?
स्वादिष्ट सुधेहूनि जिथे भाकरपाणी, तेथे०
काव्यें नकलीं नीरस वाचूनि जिवाला
वाटे न जिव्हाळा;
फेसाळत गाऊल जिथे ओहळ गाणीं, तेथे०
कोठूनि गरीबी असतां रानफुलांहीं
शृङगारित राऊ ?
बेमोल जवाहीर खुले रात्र - वितानीं, तेथे०
कोठे तरि रानांत बसूं या नि हसूं या,
जेथे न असूया !
सन्तोष पडूं दे न कुठे न्यून निघानीं, तेथे०
कोठे तरि रानांत बसूं या नि हसूं या,
जेथे न असूया !
सन्तोष पडूं दे न कुठे न्यून निधानीं, तेथे०
बान्धूं चिमणें खोपट की ऊब जयाची
दैवी प्रणयाची !
आल्या अनिकेतास खुलें स्वागत रानीं तेथे०
अङकावर खेळूनि शिकूं सृष्टिसतीच्या
आत्मप्रगतीच्या
त्या गूढ कथा ज्या न कुराणीं, न पुराणीं, तेथे०
१४ फेब्रुवारी १९२४