गज्जलाञ्जलि - ऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
ऐकटे येऊनि येथे ऐकटें जाणें पडे,
मार्ग अन्धाराहुनी हा जाय अन्धाराकडे.
देश भासे भोवती मर्यादित द्दष्टीस हा.
त्यामधे मौदान कोठे अन दरी कोठे कडे.
चालण्याचा येऊ कण्टाळा जरी केव्हा तरी
थाम्बवेना, पाय हे नादामधे नेती पुढे.
मार्ग नाना चालती वेगें कुणी, कोणी हळू;
भेट जीवाची जुळ्या दुर्मीळ दैवाने घडे.
सङगती नाही सदाची स्पष्ट हो जाणीव ही -
चित्त शोकाविष्ट थाम्बे, का परी यात्रा अडे ?
मागल्या द्दश्यांसवे अस्पष्ट हो त्यांची स्मृती,
काळ ही जादू करी की नेत्र होती कोरडे.
सर्वनाशी पूर जातां ओसरूनी मागुनी
सृष्टि तेथे हो नवी अन नष्ट तें खाली दडे.
लोपतीं चित्रें जुनीं तों द्दक्पथीं येती नवीं,
पालवें आशा हृदीं अन द्दष्टि या द्दश्यीं जडे.
- पद्मपत्री बिन्दु तेवी तू नि मी देवी जगीं,
नित्यता नाही म्हणूनी का नये भेटूं गडे ?
१९ एप्रिल १९२८
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP