रतलें परपुरुषाशीं रे, मी रतलें परपुरुषाशीं. ध्रु०
मधुर मुरलिसुर हलवुनि थरथर ओढिति या चरणांशी. १
पैलतिरावर कुंज मनोहर, माझी तेथ मिराशी. २
भिकार सागर गर्जो भेसुर, पुसतें कोण तयाशी ? ३
प्रबल कुसुमशर उचलि परांवर, नेइल पैल तिराशी. ४
तरंग मनि किति ! झुळुका ढकलिति, उत्कंठा-शीडाशी. ५
चंचल उर जरि चळलें सावरि रति आवळुनि तयाशीं ६
परचुंबनमधु पिउनि पुसति वधु का शिळपट नवर्याशी ? ७
लज्जाभीती घोळुनि पीती रमती ज्या पर-पाशीं. ८
जडलें मन जर परपुरुषावर, भान न मग शरिराशी. ९