"माझ्या दारावरनं कोण गेलं झपाट्याचं ?"
"लाजूं नको ताई, तें ग वारं सोसाट्याचं" १
"माझ्या दारावरी घोड्याची वाजे टाप"
"लाजूं नको ताई, डफावरी वाजे थाप." २
"माझ्या दारावरी हळू बोले कुणी तरी"
"लाजूं नको ताई, कुणी वाजवी बासरी. ३
लाजूं नको ताई, ढुंकूं नको बारींतूनी,
खंत कोणाची ग? आलं कोणाचं ग कोणी? ४
पाहुणा आला दारीं कुणी तरी ग रात्रींचा,
पाहीं बहिणाताई, का ग तुझ्या ओळखीचा? ५
वेणीफणी करीं, घाईघाई घालीं साज;
कोणी कोणाचं ग सांजचं आलं आज ? ६
लाजूं नको ताई, पाय धुण्या आणीं पाणी;
चांदीचे प्याले आणीं चांदीची चहादाणी." ७