दुनियेच्या भरल्या बाजारीं तुम्हिच करा जा सौदा;
मला फकीरा पुरे प्रिया ही, नको गजाचा हौदा.
वेळ न खणण्या भूतकाळ, जा उकरा दौलत पुरली;
मला आळशा पुरे प्रिया अणि ओठावरली मुरली.
वाट भविष्यीं पुसत जा ग्रहां चाचपडत अंधारीं;
मूर्त सुखचि ही प्रिया सोडुनी अमूर्त कोण निहारी ?
तुम्हीच मिळवा स्वर्गिं अमरपद हवि अर्पुनिया देवा;
स्पर्शें सखिच्या अमर जाहलों, मला न तुमचा हेवा.
भरा भरार्या कल्पनेचिया अजब अशा मुलखांत,
मूर्त कला लाभतां कशाला वार्यावरिल वरात ?
जा कुठेहि जगिं या कांह न् कांहीं उणें,
तिळ एक न जागा कोठें न्यूनाविणें,
मग केविलवाणें काय वृथा हिंडणें ?
एक सखीच्या ह्रदयिं पूर्णता मज लाभे संसारीं -
कशास वणवण करूं वृथा मी हिंडुनि दारोदारीं ?