मधु मागशि माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडति घरीं ! ध्रु०
आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी,
करिं रोष न सखया, दया करीं. १
नैवेद्याची एकच वाटी
अतां दुधाची माझ्या गांठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगीं अंगणीं कशी तरी. २
तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचें मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि रे बळ न करीं ! ३
ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति ह्र्दया,
अतां मधूचे नांव कासया ?
लागले नेत्र रे पैलतिरीं ४