वंदन व्हावें हरि, मम जीवित. ध्रु०
शरीर हें अभिषेकपात्र, तें निमळ शुद्ध असावें. १
अभिषेकास्तव जीवन माझें पावन विमल असावें २
कर्मे सारीं फुलें पुजेचीं समजुनि कर्म करावें. ३
श्वासोच्छ्वासहि धूप पुजेचा, हें न कधीं विसरावें. ४
ज्योति जिवाची दीप पुजेचा, भावें ओवाळावें. ५
आरति व्हावी वाणी माझी, वचनीं स्तोत्र झरावें. ६
नैवेद्यास्तव नवरसभोजन, तुला ग्रास अर्पावे. ७
संपत्, संतति, मुक्ती इतरां, हरि, मज इतुकें द्यावें. ८