जोग धरुनि भगवें कशाला मग तुज गांव हवें? १
याच तरुखालीं
खालिं, कुसापाशीं ठाण कां देशि ? कवणपाशीं ? २
टाकुनी दुसरीं,
दुसरीं सकळ तळीं येशि कां स्नाना याच जळीं ? ३
स्नानिं का 'हरहर !
हरहर !'गर्जोनी पाहशी वर तूं चोरोनी ? ४
खुडोनी कमळें
कमळें या कांठीं टाकिशी सांग कुणासाठीं ? ५
याच जळिं कां तूं,
तूं धूशी छाटी, वाळवित बसशी कां कांठीं ? ६
त्यजुनि देवांचीं,
देवांचीं गाणीं रमे कां रतिगीतीं वाणी ? ७
गाशि तूं विरही,
विरही कृष्णाचीं गायनें रुक्मिणिहरणाचीं. ८
सुभद्राहरणीं
हरणीं तुज गोडी भक्तिचीं भजनें का थोडी ? ९
खिडकिवर टाकिशि,
टाकिशि कां डोळा? प्राण कां होति तुझे गोळा ? १०