हळु हळु हळु वर वर नभिं मेघशकल चाले,
नील जली नाव काय मूक शांत हाले ? ध्रु
अरुण, जांभळी, सुनेरि
लखलख करि कड रुपेरि,
सायंतनिं हें पाहुनि नयन भरुनि आले! १
काय रम्य हें विमान
ज्यांत बसुनि पुण्यवान
वरि वरि वरि अपुल्या घरिं जावया निघाले ! २
पुण्यात्मे भवयात्रा
साधुइ तर्पुनि गात्रां
गांठति घर पाहुनि वर व्याकुळ मन झालें. ३
काय कधीं मजसमान
पुरुषास्तव ये विमान
हें वाटुनि उर दाटुनि ह्रदय भारि झालें ! ४