तोः
तुम्हि असें समजतां, गुपित न तुमचें कळलें,
परि माणुस अमुचें मनांत तुमच्या शिरलें.
लपवोनि सात खोल्यांत लाविलीं दारें,
राखिती दरारा दारीं खडे पहारे,
भरभक्कम केली त्यांत वरुनि तटबंदी.
ढुंको न आंत कीं गुंड बंड कुणि फंदी.
अति कडेकोट हा करोनि बंदोबस्त
तुम्हि अशा भरंवशावरी घोरतां स्वस्थ.
तुम्हि सुखें निजा हो महाराज, घनघोर;
चोराच्या वाटा एक जाणतो चोर. १०
पाडिला भेद, फितविले पहारेवाले
हे घरचे वासे फिरले, विपरित झालें.
घरभेदू, बांके कमानवाले डोळे
कुचमती खुणविती आंतिल सोळें ओळें.
या घरावरुनि का एकच वाट झर्याला ?
ते चुगल पाय परि ओढिति या मार्गाला.
कां इथेच कमरेवर घागर खळखळते ?
कां इथेच तुमचे कांकण हो रुणझुणती ?
कां इथेच तुमचे पैंजण हो झुमझुमती ? २०
कां इथेच तुमचा पदर असा थरथतो ?
कां कुरळ्या केसावरुनि हात सरसरतो ?
कां इथेच मुरडुनि मुरुडुनि बघतां मागें ?
कां इथेच बहिणिस रोजच भरतां रागें ?
जर यापरि घरचे फितूर चाकर व्हावे
तर एक धन्यानें कितीक सांभाळावें ?
जा बघा जरासें कोठे तुमचें रत्न.
आमुचा बिलंदर चोर चुकेना केव्हां
किति यत्न करा, किति जपा आपुला ठेवा. ३०
उधळिला घरांतिल खडा खडा मर्दानें,
कोपरा कोपरा स्वैर हुडकिला त्यानें;
कोण हा चोर, का महाराज, सांगाल ?
इवलेंसें कोडे ? सांगा का उकलाल ?
जर म्हणाल तर हा चोर धरोनी देऊं,
परि चार पंक्तिंचा लाभ तुम्हा घरिं घेऊं ! ३६
तीः
तें हिरा काय कीं हळूच त्या चोराल,
कोंदणीं जडोनी बोटावर मग ल्याल ?
बांसरी काय कीं ओठांनीं चुंबाल,
मग सूर भरोनी उन्मादें नाचाल ? ४०
तें शराब का कीं गटगट प्याला प्याल ?
मतवाले होउनि झिंगुनि झोले घ्याल ?
आकाश काय कीं ग्रहतारे वेधाल,
स्वार्थार्थ आपुलें भविष्य मग वर्ताल ?
तें समुद्र का कीं खुशाल गोते घ्याल,
तीं प्रवाल मोत्यें हातांनीं उकराल ?
कुणिकडे तयाचें तीर, कुठे तळ बोला,
इवलेंसें कोडें उकला, सुखांत डोला.
जें पदरीं पडतां स्वर्ग तुच्छ मानाल,
जें पदरीं पडतां अमृताला विसराल, ५०
तें काय तुम्हांला सहजासहजीं मिळलें ?
मग काय बरळतां गुपित तुम्हांला कळलें ?
राहुं द्या पंक्तिच्या, चोरीच्या हो बाता,
तें अशा रितीनें कधीं न येइल हाता.
तुम्हि काय समजलां सांगा, स्त्री-ह्रदयाला ?
का पोरखेळ हो मनीं मानितां त्याला ?
तुम्हि आकाशाला गवसणीहि घालाल,
स्वर्गही सुतानें हवा तरी गांठाल,
भूगोलखगोलादिकां मुठिंत आणाल,
स्त्रीह्रदयाचा परि थांग न कधिं पावाल. ६०
ज्या देतों त्यावर तनमन ओवाळीतों,
ज्या देतों त्याला अपुलेपणहि देतों.
किरणास्तव एका सूर्य मोल मागेल,
थेंबास्तव एका मेघ दाम सांगेल,
श्वासास्तव एका विनिमय घेइल वायू,
ज्या देतों त्या परि देतों अपुलें आयू !
कधिं कुणीं ऐकिलें काय कुलवधूलाही
ह्रदयाचें अपुल्या मोल मागतां कांहीं ?
चालला सकलही प्रपंच या दानानें,
मांगल्य दिव्य जें तेंहि याच यज्ञानें. ७०
ब्रह्माशिवविष्णू यांहि दरारा ज्याचा
होईल दास तो मदन देउं ज्या त्याचा.
स्वार्थावर अपुल्या आधीं पाणी सोडा,
सर्वस्व होमुनी सर्वस्वच हें जोडा. ७४