दिनांतीं श्रमांतीं किती गोड शांती !
सकलहि घरिं जाती श्रमोनी दिनांतीं. ध्रु०
एक नच वासरूं,
नाहिं चिटपांखरूं,
गजबजति गृह-तरू
तेथ सुखें गाती. १
क्रमुनि पथ आपुला
निकट अस्ताचला
पांथ रवि चालला
सावरूनि कांती. २
ओस पडल्या दिशा
ये भराभर निशा;
निघति छाया कशा
गुहांतुनि धरांतीं. ३
चकित हरिणीपरी
हरिणनयने, परी
कां उभी तूं तरी
क्षेत्रतटप्रांतीं ? ४
कोण ये या स्थळीं ?
चाल सदना मुली,
पेटल्या पुरिं चुली
पाहि सांजवाती. ५
लेक, लेकी, सुना,
मिळति वडिलां जनां;
काय तुझिया मना
पाडि इथे भ्रांतीं ? ६