गहनविपिनिं करि गौरि घोर तप,
जरठास्तव नवयुवती करि जप ! ध्रु०
नीरस हर तो भणंग जोगी,
रसें रसरसे ही सुखभोगी;
फटिंग तो, ही तपे वियोगीं;
स्मरारि तो, ही स्मरसुखलोलुप. १
उपवर मुलिंनो, कित्ता गिरवा,
त्यजुनि फाकडा धटिंग हिरवा
फटिंग जोगी पिकला भगवा
वरा ! पुजा हर सफल गतत्रप. २
नशीब अमुचें जरठ वरांचें !
सोंगाड्या मुलि, ढोंग जपाचें !
लचके रुचती या तरुणांचे;
नातरि वरितों मुली सपासप. ३
आजोबा या म्हणति अम्हांला;
ठार करिति उरिं खुपसुनि भाला,
गौरि असें का म्हणे हराला ?
पाहुनि घेइल शंभु भवाधिप. ४