दिव्यांगनेची ओढ
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.
"तरुणा जिवा, अंत
हें सत्य अत्यंत;
कसली वृथा खंत ?
करिं मौज घडिची ! १
होई तुला काय ?
कां नूर तव जाय ?
कसली जिवा हाय ?
वद, लागली रे ?" २
"स्वप्नांत सुस्नात
दिव्यांगना कांत
पाहूनिया भ्रांत
हा जीव झाला. ३
लावण्य तें दिव्य
सौभाग्य तें भव्य
वर्णील कविवर्य
कधिं कोण होई ? ४
तीचा जिवा ध्यास,
तीचाच हव्यास,
तीची सदा आस
झुलवी जिवाला. ५
नभिं येइ नक्षत्र,
भासे तिचें चित्र.
चोखाळ हे नेत्र
नच साक्ष देती. ६
येतां उषःकाल
प्राची फुले लाल,
स्मरती तिचे गाल;
परि फोल तेंही. ७
पाहुनि कुसुमास
होई तिचा भास;
परि तेंहि जीवास
माझ्या पटेना" ८
"रे स्वप्न तें स्वप्न !
कां होश उद्विग्न ?
हें कोठलें विघ्न !
हें काय मूर्खा ? ९
शोधूनि परिसास
हो मात्र परिहास
आणील करिं त्यास
कुणि जन्मला का?" १०
"निंदो अतां कोणि,
वंदो अतां कोणि,
मज सारखे दोन्हि,
मन हें वळेना ११
लाभेल ती खास
हा एक विश्वास !
ही एक रे आस
आधार जीवा." १२
"तरुणा पिसें सोड,
भरलें किती गोड
रे ताट तें ओढ
जें लभ्य लोकीं." १३
"रे पंजरीं पक्षि
तें तें दिलें भक्षि,
तो तृप्त; का लक्षि
कधिं रानमेवे ? १४
धिग्धिग् ! जिणें व्यर्थ
जेथे न पुरुषार्थ,
ना स्वार्थ-परमार्थ !
मरणें बरें रे ! १५
कटु मद्य हें गोड,
लागे जिवा ओढ,
मिळवील ते जोड
दिव्यांगनेची." १६
N/A
कवी - भा. रा. तांबे
जाति - दिव्यांगना
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - १७ मार्च १९३५
Last Updated : October 11, 2012
TOP