या, या हो, या हो रसिका, येथे लपा,
जो शब्द बाळपणिं गेला त्याचा हा तोटानफा.
ती काय बोलते ऐका चोरुनि जरा,
त्या तिर्हाईत पांथस्था जो आला तीच्या घरा.
जाति - मुद्रिका
"जिवाचे लागेबांधे ठाव नाहीं सख्या भावा;
वाटेच्या मुशाफिरा, जाईं जाई दुज्या गांवा. १
जन्मोजन्मीचं तें तळा गेलं आतां पाप;
गुहेच्या अंधारांत लोपलं रे आपोआप. २
चाळवोनी आतां ओढिशी का वरवर ?
वाटेच्या वाटसरा, दृष्ट जादूची आवर. ३
बिळांत झोपे नाग, नको घालूं रे फुंकर;
चाळवून त्याला नको ओढूं वरवर. ४
असावधपणीं शब्द गेला कधीं काळीं;
भरल्या संसारांत नको फोडूं रे किंकाळी ! ५
झालं गेलं आतां नाहीं त्याचा मागमूस;
माझे आई गंगे, कां रे उकरिशी कूस ? ६
सांज झाली तरी जाईं जाईं दुज्या गांवा;
वाटेच्या वाटसरा, नको साधूं पुरा दावा. ७
कालवूं विष नको भरलेल्या आतां ताटीं;
झालं गेलं त्याची कशासाठीं आटाआटी ? ८
जन्मोजन्मीच्या रे तुझ्या ऋणानुबंधाची
गोष्ट लांब गेली, वाट पुढील जन्माची. ९
पुढील जन्मीं आता तुझा हिशेब करीन;
गहाण जीव माझा, मी या जन्मीं पराधीन." १०