हरि, अर्पावें काय तुला मी ? ध्रु०
दीन दरिद्री अति मी, पूजाद्रव्य कुठुनि आणावें ? १
धूप, दीप, जळ, फूल, फळ तुझें कसें तुलाच वहावें २
माझें मजला कांहिच न दिसे, मग तुज काय यजावें ? ३
रिक्तहस्त तरि कसें तुजपुढें स्वामि, उभें ठाकावें ? ४
मीपण मम मी म्हणें तेंच मी अताम अर्पितों भावें. ५
विदुराच्या त्या कण्या, शबरिचें उच्छिष्टहि सेवावें, ६
त्या त्वां माझें मीपण कडुही गोड करुनि हरि, घ्यावें. ७