ये ना हंस उडाला हाता,
कां रे तळमळ करितां आतां ? ध्रु०
अनंत निर्मळ गगननीलिमा येइ न हातिं धरितां;
त्यांत निसटुनी घेत भरारी वितळे बघतां बघतां, १
रत्नखचित हा सुवर्णपंजर; त्यांत लोभुनी फसतां
रमुनि रमविलें, परि न गुंतला तटका तोडुनि जातां. २
भक्कम तुमचा पंजर बळकट; दार जखडिलें असतां
निघे तयारी कडेकोट ही जुमानिली नच निघतां. ३
मोत्याचा चारियला दाणा प्राणांहुनि या जपतां;
निघे लावुनी चटका ! कोठे तुमची मायाममता ? ४
रमला, झुलला, फुलला, खुलला मनगटावरी डुलतां;
कां मग तातडि तीरसा सुटे टाकुनि पंजर उडतां ? ५
कुणीं दिली या हांक ? कोठुनी कानीं येउनि पडतां
हा तडफडला, हा फडफडला निघे निरोप न घेतां ? ६
पूर्ववनांतिल रव परिचित का कानीं याच्या येतां
होउनि जागी स्मृति, खडबडुनी निघे न कांहीं बघतां ? ७
मधुर रवें हा पंजर घुमतां मोहवि सार्या जगता,
सुना रिकामा मुका तिडिक दे नयनां आतां बघतां. ८
कां रे डोळे फाडुनि बघतां ? कां रे उर बडवीतां ?
कां तळमळतां ? कां हळहळतां ? आतां न फिरे परता ! ९