जेव्हां लोचन हे तुझे विहरती या माझिया लोचनीं
तेव्हां ज्योति झळाळते जिवलगे, सौदर्यसीमाच ती !
वर्णाया तरि वर्ण आणुं कुठुनी ? कुंठेच माझी मती,
राहीं मूक उभा, गती नच अतां वाचाळतेलागुनी.
कैशी मी लपवूं, कुठे छिपवुं ही रम्याकृतींची खनी ?
हें माझें पडके भिकार घरटें, या चोरही घेरिती,
ठेवूं मी ह्रदयांतरीं तरि तया कांटे अतां व्यापिती,
कोठे ठेवुं तरी सुरक्षित हिला काळाचियापासुनी ?
वाणीचें बनवीन मंदिर तरी सौभाग्य तें कोठुनी ?
जें लाभे कविला तया यम जया कांपे सदा निर्दय.
रंगीं रंगुनि जो रची सुकवितामंजूशिका-वाङ्मय
त्याला ये लपवावया निजसखी, आशा वृथा मन्मनीं !
आतां दीनदयाघना, चरणिं रे ही एकचि प्रार्थना,
नेता पुण्यमयी प्रिया तिजसवें ने पातकी या जना.