तूं कवण जगांतिल ललना ? ध्रु०
बाण-कल्पनासृष्टींतुनि का अवतरलिस या भुवना ? १
गंधर्वांच्या सुरसृष्टीमधिं पावलीस का जनना ? २
का नंदनवनकुसुम पातलिस रिझवाया मम नयनां ३
सुर-जान्हविंतिल कमलगंध का मूर्त येशि मम सदना ? ४
आनंदच का शरीर धरुनी आलिस विहसितवदना ? ५
येइं, करीं पावन या सदना लावुनि कोमल चरणा. ६
स्थिरावले हे लोचन, पडली भुरळ बघुनि तव नयनां ७
स्रवुनी सुहसित चंद्रकिरणमय उजळी या मम भुवना. ८
बहु रत्नांची जननि जागवी ह्रदयगुहागत कवना. ९