जय जय जननी देवि ! जय जय भगवति शारदे !
नमूं तुला मी केवि ? वानूं कवण्या वाणिनें ? १
अनंतगत तूं स्फूर्ति, मूल शक्ति, जय अंबिके !
तूं सच्चित्सुखमूर्ति, जगीं असज्जडदुःखिं या. २
पापघटीं निष्पाप, अमंगलीं मांगल्यखनि !
त्रिविध घोर भवताप, त्यांत सुधाकर शीतला. ३
मूर्त सत्य तूं देवि; असत्यमय संसारिं या
पंकीं पंकज जेवि कोळशांमध्यें कीं हिरा ! ४
कुरूपतामय भूमी, असौंदर्यि सौंदर्य तूं !
स्फुलिंग ज्यापरि धूमिं काष्ठगर्भगत ज्योति कीं ! ५
सोरठा
एकीकृत सवेंद्रियीं देवि, तुला प्रणिपात !
दुरित दूर करिं माउली ज्ञात तसें अज्ञात. ६
दोहा
ध्यानावस्थित करुनि मनाला
स्थितप्रज्ञ मुनि शोधिति ज्याला,
तयांहि ज्याचा लेश कळेना,
वेदांला जो देवि, वळेना, ७
तया अ-जाला घालुनि जन्मा
कोण अकर्म्या जुंपी कर्मा ?
निराकार गे अगुण अनंता
कुणीं कोंडिलें त्या भगवंता ? ८
सगुण मूर्त त्या सांत करोनी
नाचविलें गे सलील कोणी ?
वाल्मीकिमनीं करुनि विलासा
खेळवोनी निज बाळा व्यासा ९
कोण सोडवुनि अढळ पदाला
लोळवि त्याला तुझ्या पदाला ?
तुझ्या कटाक्षा कोण निवारी ?
आली नाचत खाली स्वारी ! १०
महालांतुनी खोपट्यांतुनी
नगरांमधुनी कीं रानींवनिं,
रावांसंगें, रंकांसंगे,
गोपांसंगें कृषकांसंगें
पापी दुःखी भूवरि ओढुनि
नाचविलें त्या दुसर्या कोणीं ? १२
दोहा
अतर्क्य महिमा असूनिही भूवरि तुझा निवास !
दुःखी पापी जनमनीं सुखमय पुण्यविलास. १३
पादाकुलक
अनंत माझीं असतिल पापें,
परि ह्रदयस्थे, अघ तुज कांपे.
कोण अन्यथा ह्रदयीं पापी
मंगलमय मधु सुर आलापी ?
भेसुर भरल्या मनिं किंकाळ्या
त्यांतुनि रागिणि केवि निघाल्या ?
अशिव अभद्रें भरलों आई,
विटाळलिस परि त्यांहीं नाहीं. १५
अति विरूप अति कृष्ण मनीं या
पुण्य रम्यता गे कुठुनीया ?
अतिलंपट मी स्वार्थी कामी
शुभ शृंगारा गाइन का मी ? १६
पुतळा केवळ मी अनृताचा
कशी सत्यमय येइल वाचा ?
खोटी लज्जा, हसणें खोटें,
खोटी भीती, रुसणें खोटें, १७
हे मम चाळे, मर्कट-चेष्टा,
पोटासाठीं हाल-अपेष्टा !
धनिकलोचनां बघुनि रहावें,
श्वानकाकसें जीवित जावें, १८
निःस्पृहतेची केवळ खाणी
कशी निघावी निर्भय वाणी ?
हीन दीन अतिमंद असा मी
गाणीं माझीं म्हणूं कसा मी ? १९
नाहिं नाहीं माझी वाणी,
आइ, सरस्वति, तव हीं गाणीं ! २०
जाति वल्लभा
छलछद्ममय भूवरि न करिशी देवि, जरि संचार गे
या त्रिविध तापें दग्ध मनुजां कोण मग आधार गे ?
जगिं कोण रोधि तुझ्या प्रवाहा ? वेग तव अनिवार गे,
मग सत्य-शिव-सौंदर्य यांना काय पारावार गे ? २१
अनंतास आकळी कसा सांतेंद्रियगण सांग,
नमस्कार माझा तुला सरस्वती साष्टांग ! २२
ऊर भरे; दृष्टी झरे, फेडुं कसे उपकार ?
भास्कर करिशी काजव्या, तुझ्या दयेस न पार. २३