वाटलें नाथ हो, तुम्ही उतरतां खालीं
दे असहकारिता हांक तुम्हां ज्या कालीं. ध्रु०
हंबरडा फोडी आर्त महात्मा जेव्हां
आघात झेलिले घोर उरावर तेव्हां,
त्या यज्ञें द्रवुनी गमे धावलां देवा,
ऐकिली आर्त किंकाळी. १
वाटलें उघडलीं द्वारें तीं स्वर्गाचीं,
वाटलें धावली माउलि ती गरिबांची,
वाटलें पळालीं सकळ संकटें साचीं,
गरिबांचा आला वाली ! २
घेतली धाव हो तुम्हीं द्रौपदीसाठीं,
गरिबांस्तव धरिली तुम्हीं कांबळी काठी,
गुरगुरलां होउनि पशुहि गांजल्यापाठी,
ती वेळ वाटलें आली. ३
परि हाय ! कोणतें पाप आडवें आलें ?
हा ! कपाळ फुटलें, संचित तें ओढवलें !
परतली माउली, स्वार्थानें अडव्लें,
आशेची माती झाली ! ४
हा दुणावला हो घोर अतां अंधार,
ह्या दिशा करिति हो भयाण हाहाकार,
जखडिती पाश हो अतां अधिक अनिवार,
हा हाय गति कशी झाली ! ५