ये पहाटचा तारा गगनीं,
कुणिकडे निघशि लगबग करुनी ? ध्रु०
तार स्वरिं आरवे कोंबडा,
सुरू न झाला अजुनि चौघडा,
काक एक जागला निसुरडा,
खाकारि कुठे तरि वृद्ध कुणी. १
अजुनि रात्र ही देइ जांभया,
घरोघरीं मिणमिणती समया;
निघशि झुंजुमुंजू या समया,
वाटे न भीति का तुज तरुणी ? २
शुक्राची चांदणि झळके वरि,
भूवरिची चांदणि तूं कुमरी !
तुझी न येई तिला सर परी,
लागेल दृष्ट तुज गे रमणी. ३
"वेळ घालवूं नका हटकुनी
गांठायाची मज पुष्करणी,
वनीं कार्तिकस्नान करोनी
सूर्योदयिं येणें मज फिरुनी." ४
कुणी सोबतिण नाहिं बरोबर,
वेळ चोर-जारांची ही तर,
मिळेल का त्या वनीं खरोखर
या समयिं सोबती तुला कुणी ? ५