थांब जराशी !
चपलचरण सखि जाशी ? ध्रु०
मुरड परत अशी त्वरित, बघिन खचित पळ या दिव्याशीं. १
या प्रभात-करीं स्नात, मधुर गात दिसशी कमलाशी २
मधुर मधुर, नयन मधुर, मधुर पदर जणुं खळें मुखाशीं. ३
मधुर चित्र, अति पवित्र ! कुठे क्षेत्र या पुढती काशी ? ४
भरुं दे मन, करित मनन, मग रेखिन सखि, या चित्राशीं. ५
पुसतिल जन, रमणि कवण ? मी म्हणेन केवळ सुखराशी ! ६