रुणुझुणु ये, रुणुझुणु ये झणकारित वाळा
लुटुलुटुलुटु दुडुदुडुदुडु ठुमकत ये बाळा ? ध्रु०
धुंदि अजुनि रजनिनयनिं;
सावरूनि पदर धरुनि
शुभवदना उडुरदना देइ जांभयांला. १
दिग्ललना धौतमुखी
रत्नदीप कनकतबकिं
घेउनिया बाहति या बालबास्कराला. २
काकड-आरति करिती
देवगृहीं नवयुवती;
आळविती जागविती नंद-नंदनाला. ३
रजनितनय मारुतगण
नृत्य करिति चपलचरण,
तोम् तननन झूम् झननन करिति गायनाला. ४
जागति बघ चिउकाऊ;
लागति घरट्यांत गाउं;
डोलति तरु, लगति करुं ते हरिभजनाला. ५
जागति गोठ्यांत गाइ,
पाजति वत्सांस पाहिं;
ये रांगें ! कळ लागे माझिया स्तनांला ! ६