अगाध, निर्मळ, अपार, सुंदर, शांत, नील गगनीं
चंद्रसूर्यतारे तव करिती पुकार दिनरजनीं.
स्फटिकोपम या नील सरोवरिं आनंदें डुलुनी
अरुणवर्ण हीं कमळें फुलती तान तुझी भरुनी.
गगनभेदि हे गिरी पुरातन शुभ्रधवल वदनीं.
तुझें अनंता, प्रवचन करिती गूढ मूक वचनीं.
कळ्यांकळ्यांना नाचवीत हा गंधवाह वाही.
अनुपम मधुमय अनिर्वाच्य तव वार्ता जगिं वाही. ८
लेवुनि भरजरि झगा अरुण हा सुवर्ण वर्णांहीं
नभःपटीं तव चित्रलेखनीं गुंगुनिया जाई.
मोहिनिमंत्रा शिंपित येई श्यामल ही संध्या,
तुझ्या सुखस्वप्नांत गुंगवी जगा जगद्वंद्या !
लेउनि काजळि शालू येई गभीर ही रजनी,
अरे अनंता, मोहनि घाली गान तुझें म्हणुनी !
तूं सततोद्यतखड्ग अनंता, दृष्टां दंडाया
गुर्जुनि गर्जुनि सागर सांगे रोषें बधिरां या. १६
अकांडतांडव करुनि खड्गसम जळत्या जिव्हांनीं
दांत रगडुनी तडित् कडकडे रुद्ररूपकथनीं.
रूपांरूपांमधुनि निह्गे हा अनहत तव नाद,
भाग्यहीन मी बधिर पडेना कानीं पडसाद.
रूपीं रूपीं तुझी अनंता, विभूति विस्तरली,
डोळे फुटले माझे ! सारी सृष्टि तमें भरली.
प्रफुल्लह्रदया, अमृतसागरा, माझ्या कविराया,
मंत्रोदकिं परिमार्जुनि उघडीं कर्णां नयनां या. २४