जय वाल्मीकी ! तुज हें तर्पण;
तव चरणीं सर्वस्व समर्पण ! ध्रु०
त्रिभुवनपति जो राम रघूत्तम,
सुरनरकिन्नरनुत पुरुषोत्तम,
हे वाङ्मयतरुकोकिल, निरुपम
त्या रामा तूं देशि रामपण. १
विधिहि शकेना द्याया कवणा
तीं दश वदनें देशि रावणा;
राम यमाधिप दे ज्या मरणा,
अमर करिशि तो सुरारि रावण. २
अधनांचें धन, अबलांचें बल,
अमंगलांचें श्रेयोमंगल
जन्मांधांचे लोचन निर्मल,
दुर्वृत्तांचें दुरितनिवारण. ३
हात दिला तूं किति बुडत्यांना !
धीर दिला किति तूं व्यथितांना !
उरीं लाविलें किति पतितांना !
जय भवनाविक पतितोद्धारण ! ४
कालाच्या अति कराल दाढा
सकल वस्तुंचा करिति चुराडा,
कालशिरिं झडे तुझा चौघडा,
जय मृत्युंजय ! जय कविभूषण ! ५