"तुम्हीं न यावें हो धन्वंतरि, जरी तापलें ज्वरें;
नका शिवूं नाडीस, तुम्हांला काय दुसरीं घरें ?"
"तुम्हां पाहिजे शेज फुलांची"- "पुरे ज्ञान हो पुरे !
आग अधिक होइल अंगाची ! खरेंच औषध खरें !"
"मग वाळ्याची उटी कपाळीं लावूं शीतळ करें ?"
"शूल दुणावे, हात न लावा. भरे मला कांपरें !"
"तुमच्या अंगा हवें चांदणें, नेउं धरुनि का त्वरें?"
"नको नको हो ! पडेन, वादळिं कशी वेल सावरे ?"
"तुम्हांस शीतोलपादि चूर्णें वाटेलच हो बरें;
काय, घालुं मी मुखीं मधांतुनि ?" "कधीं सोंग हे सरें ?
तो शिवेल नाडिस करग्रहण ज्या हवें,
स्पर्शील अंग जो देइल जीवन नवें;
त्या निदान हो ज्या मनिंचें गुज जाणवे.
प्रणयपंडिता, तुम्हां आणखी काय सांगणें बरें ?"
रसिका, सांगा कसली मात्रा मिळतां रोग न उरे?