मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
हांक

हांक

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


तूं ये गे, ये गे, ये, ये सजणे !

तनमनधनजनसदन पाहती वाट तुझी गे सखये ! ध्रु

विशाल माझें मंदिर अभिनव,

गजांतलक्ष्मी, अपार वैभव,

जों न रुणझुणे तव कंकणरव,

करविहीन जणुं विलयें ! १

सत्याचे पोकळ डोलारे,

सौंदर्याचे हे द्व्हारे,

देवाविण देउळ जणुं सारें !

करिं आरोहण सदये ! २

फळें, फुलें, रवि, शशि, नक्षत्रें,

तुजविण सारीं असार चित्रें !

येइं मंगले, शुभे पवित्रे,

प्राण वितरिं शुभ समयें. ३

ये ये तूं यक्षाची कांडी,

स्पर्शुनि जगिं या जीवन सांडी,

पाप अमंगल तिमिरा काढीं,

पसर कांति निज उदयें. ४

तूं मंगल, तूं सुख ! गे तुजविण

भुताटकीची माया त्रिभुवन,

खाया धावे मज आ वासुन,

येइ, मिळूं दे ह्रदयें ! ५

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - भूपदंड

राग - असावरी

ठिकाण - लष्कर, ग्वाल्हेर

दिनांक - ३१ ऑगस्ट १९३३

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP