जीवनाध्वरिं पडे आज पूर्णाहुती,
येइ अन्त्येष्टिघटि, आज झालों कृती. ध्रु०
कर्मभूमीवरी अवतरुनि जीं करीं
सकल कर्में हवी आज होवोत तीं. १
कोणि आणूं नका आसवें लोचनीं,
छे ! न ही शून्यता ! पूर्णता, सद्गती ! २
आज वीणेवरी भगवती शारदा
साममंत्रावली स्वैर आलापु ती. ३
आज षड्दर्शनें मूर्त येवोनिया
वेदघोषें भरुत सवनभूमीप्रती ४
शंखघंटादिकीं नाद घुमवा अतां,
चौघडा द्या झडूं या करा आरती. ५
आज पुष्पांजली स्थंडिलीं अर्पुनी
स्वस्तिवचनीं करा सांगतासिद्धि ती. ६