कुणि कसें म्हणा, कुणि करा हवें ते आतां
तें कांत यापुढें, मीहि तयांची कांता.
कुणि म्हणाच पापिण, म्हणाच कुलटा आतां,
तो एक जाणतो मला, माझिया नाथा. ध्रु०
कुणि म्हणा, भाळलें वृथा बाह्य रूपाला,
कुणि म्हणा, बळी मी पडलें तारुण्याला,
कुणि म्हणा, सोडिली लाज, सोडिली माया,
कुणि म्हणा, टाकिली भीति, दूषिली काया,
कुणि म्हणा, लाविला कलंक कुलशीलाला,
कुणि म्हणा, फासलें काळें चारित्र्याला,
कुणि म्हणा, टाकिला देव, टाकिली नीती,
कुणि म्हणा, लाविला हरताळचि शास्त्राला,
तो जुलूम तुमचा, आग लागुं दे त्याला !
जग रुसोच रुसलें, रुसो न परि तो त्राता ! ते० १
कुणि म्हणाच, मारूं, म्हणा छळूं दोघांला,
कुणि म्हणाच लावुं आग घरादारांला,
कुणि म्हणा, पेटवूं वैरहि, साधूं दावा,
कुणि म्हणा, साधुनी संधी घालूं घाला;
घ्या हातिं पाजळुनि हवी तशी तरवार,
या पडा तुटोनी ! करा हवे ते वार !
त्या दयाघनाची करुणा चिल्खत भारी,
ह्या सत्प्रीतीवर बोथटतिल तल्वारी.
आकाश कोसळो, उलो पृथ्वि या काळीं,
जी गोष्ट झालि ती आतां झाली, झाली !
मज मरण येउ, हरि सुखी राख परि नाथा ! ते० २
कुणि कसेंहि समजो, करोहि छळ या काळीं,
कुणि गांजो भाजो अमुचाही हरि वाली !
पति तुम्हीच निजपदिं हरि, जरी बोलविले
हे भ्रतार दुसरे तुम्हींच ना अर्पियले ?
आज्ञेविण तुमच्या हलेल का हो पान ?
मायेविण तुमच्या जगेल का हो कोण ?
तुम्हि सर्वसाक्ष, मग म्हणोच जग हें कांहीं,
तुम्हि 'होय' म्हणा; शास्त्राची पर्वा नाहीं !
मज माझें काळिज देतें देवा, ग्वाही,
निष्पाप असें मी, कुणी म्हणो हें कांहीं.
मग लाज तुम्हांला दीन जनांच्या नाथा ! ते० ३