नटवर तो हर ध्यावा,
प्रभातकाळीं उठोनि आधीं त्रिभुवनजनक नमावा ध्रु०
जगदंगीं ज्यातें नटवाया
अघटितघटनासमर्थ माया
नटी नाचवी ज्याची जाया;
भावें भैरव गावा. १
अरुणरूपधर सूत्रधार जो
घालुनि कंठीं रत्नहार जो
पीतांबरधर करि विहार जो
उधळि गुलाल, भजावा, २
सूर्यचंद्र अगणित नक्षत्रें,
गिरि, सागर, तरु, असंख्य पात्रें
सजुनि नटे जो लीलामात्रें,
शिवसत्याचा ठावा. ३
अपूर्व सुंदर नाटक हें जग,
मांगल्याचें आगर सौभग,
कसें म्हणावें दुःखमूल मग ?
जयजयकार करावा ! ४