चरण कधीं का पाहिन आई ? ध्रु०
त्रिभुवनजननी, मुंगीची तुज काळजि, मग का माझी नाहीं ? १
ढळे ऊन, दिन उरला थोडा, मागमूसही घरचा नाहीं. २
थकलें घोडें पाय न टाकी, कशि गत होइल आज अगाई ? ३
वाट विसरलों, बिकट घाटही उभे काळसे ठायीं ठायीं. ४
सिंह, वाघ हे चोर लुटारू टपती, आतां त्राहि त्राहि ! ५
बावरुनी मी बघें चहुकडे, शून्य दिशा मज दिसती दाही ६
डोळे सदनाकडे लागले, कुणी सखा का नेइल पायीं ? ७