"तुला न देइन माला,
जा जा चाल घराला. ध्रु०
"मोठा भोळा, घालिशि डोळा, हाणिन हा पाचोळा,
काय गिर्हाइक बाइ फुलांचा !" "पूस तुझ्या डोळ्यांला !" १
"हा फुललेला गुलाब-बेला ! तुला न देइन झेला.
कसा गिर्हाइक बाइ !" "पूस त्या गालांला, दांतांला !" २
"तुला न देईं मोहरेलाही ! दुज्यास परि पैशाला !
कसा गिर्हाइक बाइ फुलांचा !" "पूस तुझ्या जीवाला !" ३
"फुलें पाहशी, सौदा करिशी, घेशिल बघ कांट्याला !"
"रुतुं दे कांटे चलाख माळिणि, खुपुं दे ग कलिज्याला !" ४