देशि मला तूं जरी तरी दे पूर्ण ह्रदय सुंदरी.
जरि कोपरा ठेविशि राखुनि
चोर तिथें गे शिरतिल लपुनी,
घालितील गे छापे तेथुनि
रतिसाम्राज्यावरी. १
दुधामधें गे थेंब विषाचा,
सुखसंभव गे तेथ कशाचा ?
मार्ग सरळ मग तो नाशाचा
दूध विषच हो तरी. २
तार सतारिस सैल एक गे
संगीताचें नांवहि न लगे;
सोंगढोंग बाहेरिल अवघें
समज शवाचेपरी. ३
कुभावनेनें विटाळतां मन
प्रीती जाइल पळून तेथुन,
विषमय होइल जीवन त्याहुन
मरण बरें किति तरी ! ४